१) सकाळी ऊन कमी असतांना मतदानासाठी रांगा लागतील ही अपेक्षा निष्फळ ठरली!
२)कुठल्याही परिस्थितीत, मोबाईल मतदान केंद्राच्या आत नेता येणार नाही हे सांगून सुद्धा, काही सुशिक्षित लोकांनी आत मध्ये मोबाईल नेला, आणि आपण कुणाला मत दिलं त्याचा फोटो काढला आणि तो समाज माध्यमांवर टाकला सुद्धा!
गोपनियतेला हरताळ फासत नियम पायदळी तुडवण्यात कुठलं आलंय शहाणपण?
३) "मोबाईल आणू नका" ,हे सांगतांना अतिशय उद्धट पणे रागावणाऱ्या एका महिला पोलीस कर्मचाऱ्याच्या हातातच मोबाईल आढळून आला, संबंधित कर्मचारी स्वतः मात्र केंद्रात बसून मोबाईल खेळतांना आढळली तेव्हा पत्रकारांनी फोटो काढून वरिष्ठांना कळवलं, आणि त्या कर्मचाऱ्यावर तत्काळ कार्यवाही सुद्धा झाली, ही डिपार्टमेंटची तत्परता कौतुकास्पद वाटली!
४) दुपार पर्यंत संथ गतीने मतदान सुरू आहे!
५) उष्णतेची लाट आलेली असतांना काही केंद्रांवर इतक्या उन्हात सुद्धा लोक रांगेत उभे आहेत हे चित्र आशादायी आहे.
६) काही ठिकाणी पैसे मिळाल्याशिवाय घरातून बाहेर निघणार नाही म्हणून सामूहिक ठिय्या देऊन बसलेली लोकं पाहून कीव येते आहे, पण लोकं मात्र आपल्या म्हणण्यावर अडून बसले आहेत!
७) वाटप करण्याच्या पैशात सुद्धा काहींनी डल्ला मारल्याची फोडणीयुक्त चर्चा चौका चौकात रंगलेली पहायला मिळते आहे!
८) ओपीडीत आलेल्या लोकांशी चर्चा करतांना जाणवलं
की :
A) काहींनी मतदानाला जायचं नाही कारण not interested हे कारण दिलं!
B) तर काहींनी आमचं मतदान इथे नाही आणि जिथे आहे ते खूप लांब असल्यामुळे टाळून दिल्याचं सांगितलं!
C) दांपत्यापैकी पुरुषाने मतदान केलंय पण बायकोचं मतदान झालं नाही कारण लग्नाच्या 8 वर्षानंतर सुद्धा तिचे कागदपत्र बनवायला साहेबाना वेळच मिळाला नाहीय..!!?
D) काहींनी तोंडावर पैसे मिळाल्याशिवाय जाणार नाही हे ठणकावून सांगितलं, आणि मिळतील याची खात्री सुद्धा व्यक्त केली!
E) साधारण संपूर्ण देशात शेवटच्या तासात मतदानाचा वाढणारा टक्का शेवटच्या तासात मिळणारं हे आर्थिक आमिष असू शकेल ही शक्यता वरच्या लोकांच्या आत्मविश्वासामुळे अधिक बळकट होते!
F) काही ठिकाणी राजकीय मंडळी मतदान केंद्राच्या आत सरळ सरळ पक्षीय प्रचार करतांना दिसणं खेदजनक वाटलं!
G) इतकी सगळी तोडफोड झाली, इतके पक्ष बदलणारे लोक पाहिले, म्हणून लोकशाही वरचा विश्वास उडाला म्हणून मतदानाला न जाणारे पण दिसून आले!
H) आणि ओळखीतले काही जोडून सुट्ट्या आल्या म्हणून फिरायला बाहेर गावी निघून गेले, हे तेच लोक आहेत जे एरव्ही देश कसा चालवायला हवा याचे सल्ले देत हिंडतात!
I) चांगले शिकले सवरलेले बरेचसे ओळखीतले आज ऐनवेळी जागे झाले, आमचं मतदान कुठल्या केंद्रावर आहे हे शोधत फिरणारे, मतदार यादीत नाव सापडत नसलेले, आणि आता काय करायचं म्हणून चिडचिड करणारे पण पाहायला मिळाले!
हे आपलं कर्तव्य आहे की आपलं नाव आधीच तपासून पाहणं, यादीत नाव आधीच शोधून ठेवणं, पण सुजाण होण्याचा टप्पा अजून गाठायचा राहिला आहे!
पण हेही तितकंच महत्वाचं आहे की, अचानक काहींचं नाव मतदार यादीतून नाहीसं होणं ही बाब गंभीर आहे!
J) काही लोक कुठलंही ओळखपत्र(आधार कार्ड, मतदार कार्ड, इ.) न घेता तसेच मतदान केंद्रावर आलेले पण पहायला मिळाले!
K) सर्वात महत्वाचं,
बटण दाबल्यावर ज्याला मतदान केलं त्याच्यासमोर लाल दिवा लागत होता, बीप वाजत होता,आणि व्ही व्ही पॅट मध्ये तशी चिठ्ठी सुद्धा व्यवस्थित दिसून येत होती!
L) पण किती लोकं उभे राहिले होते, दोन दोन इव्हिएम मशिन्स ठेवावे लागावे इतके लोक उभे राहिले हे तिथे गेल्यावर कळलं! तिथल्या एका दोघांना सोडलं तर कुणीच ओळखीचं पण नव्हतं!
F)ज्या शाळेत मतदान केंद्र होतं ती शाळा पत्र्याची होती, फुटलेल्या फरश्या, अपुरा प्रकाश,आणि दाट लोक वस्तीच्या मधोमध स्थित असल्यामुळे तिथे पोहोचताना
अरुंद वाटेने,अक्षरशः रस्त्यावर खाट टाकून झोपलेल्या नागरिकांना ओलांडून जावं लागणं , हे सगळंच खूप क्लेशदायक होतं!
G) उष्णता खुप आहे त्यात बरेच मशीन खूप स्लो चालत आहेत,अशी ओरड ऐकू येते आहे
प्रत्येक बूथ वर बरेचसे मशीन व्यवस्थित चालतायेत , पण काही ठिकाणी काही मशिन्स खूप संथ गतीने चालल्यामुळे खूप गर्दी होते आहे,
त्यामुळे वयस्कर लोकं वैतागून किंवा गर्दी पाहून परत निघून जातयेत!
असो,
येणाऱ्या प्रत्येक पेशंट ला आम्ही मतदानाला जाण्यासाठी आग्रह केला, आणि त्याचं महत्व पटवून सांगितलं!
पण आपला देश अजूनही सुदृढ लोकशाहीसाठी परिपक्व व्हायचा राहिलेला आहे, इथल्या नागरिकांना त्यांच्या हक्कांबाबत आणि अधिकारांबाबत प्रगल्भ करत राहण्यासाठी लोक चळवळ सुरूच ठेवावी लागणार आहे!
खासदारांची कामे आमदारांची कामे, नगरसेवकांची कामे नेमकी कोणती हेच माहीत नसलेले कित्येक या भाऊगर्दीत धर्माच्या आणि जातीच्या कुबड्या हातात घेऊन अडखळताना दिसणं हेच दुःखद आहे!
डॉ अभिनय दरवडे
संगोपन बालरुग्णालय, धुळे
Post a Comment
0 Comments