शिरपूर : बिनपगारी रजा करण्याची धमकी देऊन त्या मोबदल्यात पाच हजार रुपयांची लाच घेतांना धुळे येथील राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या डीवायएसपीला अँटी करप्शन ब्यूरोचे डीवायएसपी अभिषेक पाटील व सहकार्यांनी रंगेहाथ पकडले.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला असून एसआरपीएफ गट क्र.6 अंतर्गत महाराष्ट्र राज्य आपत्ती प्रतिसाद दलात नर्सिंग ऑफिसर म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्यासह अन्य पाच महिला अधिकारी 14 व 15 एप्रिलला कर्तव्यावर गैरहजर होते. तेथील सहायक समादेशक तथा डीवायएसपी चंद्रकांत बाबूराव पारसकर यांनी गैरहजर राहिलेल्या सर्वांनी प्रत्येक एक हजार रुपये असे पाच हजार रुपये मला आणून दे, अन्यथा तुमची बिनपगारी करीन अशी धमकी दिली. मात्र सदर महिलेने त्याबाबत अँटी करप्शन ब्यूरोकडे तक्रार दिली.
ब्यूरोचे डीवायएसपी अभिषेक पाटील यांनी सापळा रचून 20 एप्रिलला एसआरपी कॉलनी येथील राहत्या घरी पाच हजार रुपये स्विकारतांना चंद्रकांत पारसकर याला रंगेहाथ पकडले. अभिषेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक रुपाली खांडवी, राजन कदम, मुकेश अहिरे, प्रशांत बागूल, संतोष पावरा, रामदास बारेला, प्रवीण पाटील, मकरंद पाटील, प्रवीण मोरे, सुधीर मोरे, जगदीश बडगुजर यांच्या पथकाने ही कामगिरी बजावली.
Post a Comment
0 Comments