धुळे : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धुळे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली, धुळे जिल्ह्यात ऑपरेशन ऑल आउट राबवण्यात आले. या अभियानात दोन गावठी कट्टे, सहा तलवारी आणि तर एक खंजीर अशी हत्यारे जप्त करण्यात आली.याबरोबरच 11 ठिकाणी गावठी दारू विक्रीचे केंद्र उध्वस्त करण्यात आली. ही कारवाई आता सुरूच राहणार असून जिल्ह्यात अवैध धंद्यांच्या निर्मूलनासह गुन्हेगारी पार्श्वभूमी असणाऱ्या कोणाचीही गय केली जाणार नाही, असा इशारा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी दिला आहे.
धुळे जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोणतीही अप्रिय घटना घडू नये यासाठी पोलीस प्रशासन ॲक्शन मोडवर आले आहे. या अंतर्गतच ऑपरेशन ऑलआउट हे अभियान पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे आणि अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांनी राबवले. या अभियानात 45 पोलीस अधिकारी आणि 170 अंमलदार सहभागी झाले. यात धुळे शहरातील मोगलाई ,मिल परिसर, गिंदोडिया चौक, एकता चौक, दंडेवाले बाबा नगर ,गुजराती कॉम्प्लेक्स, साक्री येथील भराड गल्ली, दोंडाईच्या येथील नंदुरबार चौफुली, धावडे फाटा आणि अन्य ठिकाणी ऑपरेशन ऑल आउट राबवण्यात आले. या अंतर्गत शिरपूर शहरात नागेश उर्फ सोन्या पंडित कोळी राहणार आमोदे तालुका शिरपूर याच्याकडून गावठी कट्टा ताब्यात घेण्यात आला .तर मोहाडी नगर पोलीस ठाणे परिसरातील अजय ज्ञानेश्वर वाडीले राहणार भीम नगर याच्याकडून देखील गावठी कट्टा जप्त करण्यात आला असून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तसेच धुळे शहर पोलीस ठाण्याच्या हद्दित साक्री रोड वरील सुबोध शैलेश आल्हाट, अजय मधुकर झाल्टे, वसीम अजीज शेख, जितेंद्र शंकर चौधरी, तसेच मोहम्मद कुतुबुद्दीन काझी, शाहरुख शेख मुनाफ या सहा जणांकडून धारदार तलवारी जप्त करण्यात आल्या. तर अरशद हनीफ शेख यांच्याकडून खंजीर जप्त करण्यात आला.
ऑपरेशन ऑल आउट दरम्यान गावठी दारू विक्रीच्या 11 ठिकाणचे केंद्र उध्वस्त करण्यात आले. रमेश चिंधू साळुंखे, रोहित सतीश बागुल, दीपक भगवान पाटील, बापू काशिनाथ पाटील, लता चव्हाण, बारकू भिल, मीराबाई वडर, बापू भिल, सुरेश वसावे, शरद भील यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत 79 हजार 795 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या अभियानादरम्यान साक्री येथील दोन जुगार अड्ड्यांवर कारवाई करण्यात आली. यात दोन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दरम्यान पिंपळनेर येथे आठ जणांवर तर सोनगीर येथे एकावर कारवाई झाली आहे. यात 91 हजार 610 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याच कारवाई अंतर्गत सार्वजनिक ठिकाणी उपद्रव करणाऱ्या पाच जणांवर गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी दिली आहे. दरम्यान अवैध व्यवसायांवर अशाप्रकारे कारवाई चालू राहणार असून, गुन्हेगारी प्रवृत्ती असणाऱ्या कोणत्याही व्यक्तीची गय केली जाणार नाही, असा इशारा देखील पोलीस अधीक्षक धिवरे यांनी यावेळी दिला आहे
Post a Comment
0 Comments