धुळे : महानगरपालिका शाळांच्या सेवानिवृत्त शिक्षकांची थकित एक कोटी ८५ लाख ५० हजार रुपयांची रक्कम त्वरीत मिळावी यासह विविध प्रलंबित मागण्यांसाठी
मनपा शिक्षक आणि सेवानिवृत्त शिक्षकांना राज्य शासनाने शंभर टक्के वेतन अनुदान द्यावे, सेवानिवृत्त शिक्षकांना निवृत्तीनंतर पेंशन मिळावी, महापालिका शिक्षकांना सेवानिवृत्तीची रक्कम वेळेवर मिळावी, महापालिका शिक्षण मंडळात तीन रिक्त लिपिकांच्या जागा त्वरीत भराव्यात या मागण्यांसाठी गुरुवारी आंदोलन करणार असल्याची माहिती सेवानिवृत्त शिक्षक संघटनेचे अध्यक्ष शिवाजी पाटील, कार्याध्यक्ष सुरेश जाधव, सरचिटणीस मधुकर वाणी, दिनकर शिंदे, शिवाजी नामदेव पाटील, भालचंद्र बोरसे, शेख हुसैन यांनी पत्रकार परिषदेत दिली.
महापालिकेच्या शाळांची आधी भरभराट होती. पाच-पाच तुकड्या होत्या. परंतु आतापर्यंतच्या काही नगरसेवकांनी मराठी शाळांवर डोळा ठेवला. नगरपालिकेच्या शाळा ताब्यात घेवून स्वतःच्या शाळा उघडल्या. नगरसेवकांनीच महापालिकेच्या मराठी शाळा उध्वस्त केल्याचा गंभीर आरोप महापालिकेच्या निवृत्त शिक्षकांनी केला. आम्ही काय पापं केलं म्हणून आम्हाला वेळेवर पेंशन मिळत नाही, अशी व्यथा या शिक्षकांनी मांडली. वेळेवर पेंशन मिळण्यासाठी वयाची पंच्चाहत्तरी गाठलेल्या शिक्षकांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.
साक्रीरोडवरील धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या सभागृहात धुळे महानगरपालिका सेवानिवृत्त शिक्षक संघटनेच्या पदाधिकार्यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत महापालिकेचे निवृत्त शिक्षक म्हणाले की, धुळे महापालिकेकडे निवृत्त शिक्षकांची पंन्नास टक्के हिश्याची १ कोटी ८५ लाख ५० हजार रुपयांची रक्कम थकीत आहे. त्यामुळे सेवानिवृत्त शिक्षकांना १ जानेवारी २०१९ ते ३१ डिसेंबर २०१९ या कालावधीचा सातव्या वेतन आयोगाचा फरक मिळालेला नाही. तसेच सातव्या वेतन आयोगाच्या फरकाच्या पाच हप्त्यांपैकी तिसरा आणि चौथा हप्ता अद्याप मिळालेला नाही. महापालिकेच्या शाळांमधील ७५१ शिक्षक निवृत्त झाल्याने त्यांच्यापैकी काहींचे निधन झाले आहे. आजच्या घडीला ४०० शिक्षक सेवानिवृत्त असून ५० सेवानिवृत्त शिक्षकांच्या पत्नींना निवृत्ती वेतन दिले जात आहे. अनेक सेवानिवृत्त शिक्षकांनी पंच्चाहत्तरी गाठली आहे. काहींचे वय ८० वर्षापेक्षा अधिक आहे. त्यांना अर्धांगवायु, कॅन्सरसारख्या व्याधींनी ग्रासले आहे. अशा परिस्थितीत या सेवानिवृत्त शिक्षकांना वेळेवर निवृत्ती वेतन मिळत नसेल तर उपयोग काय? आम्ही काय पाप केले? आम्ही इमाने इतबारे, ज्ञानदानाचे कार्य केले. धुळ्यातील जवळपास सर्वच डॉक्टर, इंजिनियरसह मोठ्या पदावरील व्यक्ती या महापालिकेच्या शाळांमधून आमच्या ज्ञानदानाच्या कार्यातून घडले आहेत. असे असतानाही आम्हाला हक्काच्या पेंशनसाठी या वयात झगडावे लागत आहे. थकित रक्कम मिळावी यासाठी आम्ही गुरुवारी डफ बजावो आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.
महापालिकेच्या शाळांवर भाष्य करताना शिक्षक संघटनेचे पदााधिकारी म्हणाले की, सध्या महापालिकेच्या मराठी शाळांमध्ये अवघे १९ शिक्षक कार्यरत आहेत. महापालिकेच्या उर्दू माध्यमाच्या शाळाच व्यवस्थीत चालू आहेत. खाजगीकरणाच्या नावाखाली मनपाच्या शाळांची दुरवस्था केली. काही नगरसेवकांनी महापालिकेच्या शाळांवर डोळा ठेवला. त्या शाळा आपल्या ताब्यात घेवून स्वतःच्या खाजगी शाळा सुरु केल्या. शिक्षकांकडून डोनेशन घेणे आणि इतर उपद्व्याप करुन मनपाच्या शाळा अक्षरशः बंद पाडल्या आहेत. खाजगी शाळांची वाढलेली संख्या आणि इंग्रजी माध्यमाचे फॅड यामुळे देखील मनपाच्या शाळा ओस पडल्याची खंत निवृत्त शिक्षकांनी व्यक्त केली.
Post a Comment
0 Comments